महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंचे १० आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर

Foto
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगर राबवून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना आपल्या गळाला लावले होते. या मोठ्या धक्क्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. हा धक्का ताजा असतानाच, आता शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर ३ च्या तयारीत असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

ठाकरेंच्या १० आमदारांचे मतपरिवर्तन केल्याचा दावा
या नव्या मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आणि खासदार सत्ताधारी शिंदेंच्या रडारवर आहेत. दोन्ही पक्षांतील अनेक बड्या नेत्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या दाव्यानुसार, ठाकरे गटाच्या तब्बल १० आमदारांचे शिंदेंच्या शिवसेनेत येण्यासाठी पूर्णपणे मतपरिवर्तन करण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक अडचण आणि पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी आणखी किमान ५ आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. याशिवाय, ठाकरे गटाच्या आणखी एका विद्यमान खासदाराशीही संपर्क साधण्यात आल्याचे समजते.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोठा सुरुंग लावण्याची तयारी
या मोहिमेत केवळ ठाकरे गटच नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही काही आमदार आणि खासदार रडारवर आहेत. त्यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली असून काहींच्या प्रत्यक्ष भेटीगाठीही पार पडल्या आहेत. या संपूर्ण हाय-प्रोफाईल मोहिमेची आणि पडद्यामागील हालचालींची जबाबदारी माजी मंत्री आणि आमदार डॉ. तानाजी सावंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अ‍ॅड. निलेश देशमुख यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी अत्यंत कमी कालावधीत या संपूर्ण मोहिमेला अंतिम रूप देण्याची तयारी शिंदे गटाने केली असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये ठाकरेंचे १२ नगरसेवक शिंदेंच्या गळाला? 
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटातील १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात असून, प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखवण्यात आल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक पक्षाच्या गटनेते कार्यालयात एकत्र येऊन एकजूट दाखवणार आहेत.

दुसरीकडे, शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी ङ्गङ्घहे ऑपरेशन टायगर नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी असलेले आकर्षण आहे,ङ्घङ्घ असा दावा केला आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीदरम्यान मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या संपर्कात अनेक नगरसेवक असल्याचे सांगत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या पक्षप्रवेशाचे संकेतही त्यांनी दिले आहेत.